जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या अनुषंगाने रेमिडीसिव्हर इंजेक्शनकरिता जिल्ह्यातील सर्व भाजपाचे आमदार शासनास आमदार निधी देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
देशभरात गेल्या वर्षापासून कोरोना महामारीचे सावट असून महाराष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. महाराष्ट्र शासन हे कोरोना काळात पूर्णपणे अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. याचाच एक भाग जळगाव जिल्ह्यात रुग्णांची अतिशय गंभीर परिस्थिती असून रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात पुरेसे व्हेन्टीलेटर, ऑक्सिजन बेड व उपचारासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य व कोरोनावर उपचार करण्यासाठी दिले जाणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय व जीवित हानी होत आहे.
या अनुशंघाने जळगाव जिल्ह्याची सद्यस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार मिळून रेमिडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी शासनाला आमदार निधी देण्यास तयार आहे. जेणेकरून रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होणार नाही व जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील मागील वर्षापेक्षा या वर्षीचा मृत्युदर जास्त असून शासनाने जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा वाढवावी जेणेकरून जिह्यातील मृत्युदर कमी करता येईल.
यावेळी निवेदन देतांना खासदार राक्षताई खडसे, उन्मेश दादा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिताताई वाघ, जिल्हापरिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.