जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आर्थिक वर्षात एकूण ३०२ रुग्णांना मोफत उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात आला असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य झाल्याबद्दल राज्य शासनानेदेखील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.
योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात असून येथे २ डाटा एंट्री ऑपरेटर सह नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेमधून १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कोरोना विरहित आणि कोरोनाबाधित ३०२ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये वर्षभरात कोरोनासह किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना देखील लाभ झाला आहे.
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक), अन्नपूर्णा, अंत्योदय कार्ड कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे. यासाठी ओरिजनल आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट या कागदपत्रांची आवश्यकता असते.
योजनेचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक तथा योजनेचे सचिव डॉ. वैभव सोनार, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, आरती दुसाने हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. ज्या रुग्णांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी रुग्णालयातील कार्यालयात अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव (८७६७३३७८१५) यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
“ज्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण आहे, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयातील उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना योजनेचा उत्तम लाभ होत आहे. ” – डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव


