मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून दरवर्षी केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा मात्र रद्द करण्यात आली आहे. सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एसटीने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून एसटीकडून दरवाढ केली जाते.
ही दरवाढ 30 टक्क्यांपर्यंत करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहे. या अधिकारानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात सर्व प्रकारच्या बससेवेसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करुन अतिरिक्त महसूल मिळवण्याचा एसटीचा प्रयत्न असतो. पण यावर्षी एसटी महामंडळानं ही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत एसटी महामंडळाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं अशा बिकट परिस्थितीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द केली आहे. या माध्यमातून एसटीने ‘प्रवाशी देवो भव:’ या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.