मुंंबई, वृत्ततसंस्था । सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलंय. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला लॉकडाऊन, घटलेले उत्पन्न आणि कोरोनावरील उपचाराचं ओझं अशा कात्रीत नागरिक सापडले आहेत. त्यातच इंधन दरवाढीने नागरिकांचं दैनंदिन जगणं कठीण केलंय. त्यामुळे आता झालेली 10 रुपयांची दर कपात काहीसा दिलासा देणार आहे. असं असलं तरी अजूनही घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपये असल्याने सामान्यांच्या खिशाला बसणारी कात्री कमी झाली असली तरी कायम आहे.
मागील काही आठवड्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 125 रुपयांची वाढ झालीय. त्यामुळे त्या तुलनेत कमी होणारी 10 रुपयांची दरकपात नगन्य मानली जात आहे. कपातीआधी गॅस सिलिंडरचे दर दिल्लीत 819 रुपये, कोलकाता 845.50 रुपये, मुंबईत 819 रुपये आणि चेन्नईत 835 रुपये होते. दर कपातीनंतर हे दर दिल्लीत 809, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये झालेत. झारखंडची राजधानी रांचीत हे दर 876.50 रुपये होते ते आता 866.50 रुपये झालेत.
पेट्रोल-डिझेलच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 90.56 रुपये प्रतिलिटर आहेत. तर डिझेलचे दर 80.87 रुपये प्रतिलिटर आहेत. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्याही पार गेले होते. मागील आठवड्यात पेट्रोलच्या दरातही काहीशी कपात झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने हे दर कमी झाल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.