मुंबई, वृत्तसंस्था : गेले काही दिवस सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाल्याचं पहायला मिळतंय. सोमवारी संध्याकाळी बाजार बंद होताना मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात केवळ 10 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळालंय. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 42,980 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,980 रुपये इतका आहे.
चांदीच्या दरात मात्र 1000 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 65,700 रुपये मोजावे लागणार आहेत. रविवारी हा दर 64,700 इतका होता. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे.
गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तो आज 65,700 रुपये इतका झाला आहे.
गेल्या दहा दिवसांचा विचार करता केवळ 24 तारखेला सोन्याची किंमत 1000 रुपयांनी वाढली आहे. अन्यथा इतर दिवशी सातत्याने सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 12 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.