जळगाव – राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत 31 मार्च, 2021 रोजी संपत असल्याने जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन पोलीस व प्रशासनाकडून केले जात असून दुसरीकडे सवलतीची मुदत संपत असल्याने गर्दी होऊ नये व लोकांना सवलतीचा फायदा घेता यावा, यासाठी 31 मार्च, 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क भरा आणि पुढील चार महिन्यात कधीही दस्त नोंदणी करण्याचा पर्याय नागरिकांना देण्यात आला आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गतवषी खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन रिअल इस्टेटलाही चालना देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 2 टक्के सवलत दिली आहे.
पहिल्या टप्यातील सवलत योजनेला संपुर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सवलतीचा दुसरा टप्पा 31 मार्चला संपत असल्याने नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासुन दस्त नोंदणीसाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. कोरोना परिस्थिती असल्याने गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतांना केवळ सवलत योजनेची मुदत संपत असल्याने दस्त नोंदणी कार्यालये दस्त नोंदणीसाठी गजबजलेली पाहायला मिळत आहे.
या सवलतीचा आता खरेदी–विक्री तसेच बक्षीसपत्र करु इच्छिणाऱ्यांना लाभ होणार असुन 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरुन ज्या दिवशी मुद्रांक शुल्क भरले आहे तेथुन पुढील 4 महिन्यांमध्ये दस्तनोंदणी करता येणार असल्याने याचा विशेषत्वाने फायदा घ्यावा. तसेच नागरिकांनी आता मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यास पुढील चार महिन्यात त्यांना दस्त नोंदणी करताना सध्याच्या सवलतीचा फायदा घेता येऊ शकेल.
तरी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी करु नये व कोव्हीडपासून आपले तसेच इतराचेही संरक्षण करावे, सुचनांचे पालन करावे. असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.