जळगाव – कोरोना विषाणूचा देशवासियांना संसर्ग होऊ नये,त्याचा फैलाव होऊ नये या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च २०२० पासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन ची घोषणा केली. आज त्याला एक वर्ष होत आहे. लॉकडाऊन च्या या काळात समाज्यातील प्रत्येक घटकाला आर्थिक संकटासोबत शारीरिक कष्ट देखील पडले. यामुळे कोरोना विषाणूला रोखण्यासोबतच आरोग्य यंत्रणेला उपचारासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचे नियोजन करण्यास देखील वेळ मिळाल्याने मदत झाली. मोठी जीवित हानी होण्याआधी शास्त्रज्ञांना लस तयार करण्यास देखील वेळ मिळाला.परंतु लॉकडाऊन दरम्यान आपण सर्वांनी जो त्याग,वेदना सहन केल्या त्यामुळे झालेला फायदा आपण जास्त काळ टिकवू शकलो का? त्यात आपण कुठे चुकलो? आपण यापुढे काय काळजी घेतली पाहिजे? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या कित्येक दिवसांपासून नऊशे च्या वरच येत आहे .काल तर एक हजारा पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले.आज जळगाव शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांना शासकीय ,खाजगी रुग्णालयात बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा आपण कुठे कमी ते बघितले पाहिजे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या का वाढतेय
गेल्या वर्षी कोरोना विषाणूची जी भीती होती तशी भीती लोकांच्या मनात आज राहिली नाही. लग्न,अंत्ययात्रा, असो की दहावे असो लोकांची गर्दी दिसून येते. याठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्स याचे भान कुणालाच दिसत नाही. सॅनिटायझर जसे गेल्या वर्षी प्रत्येकजण खिशात ठेवायचा ,त्याचा वापर करायचा ते आज वापरतांना दिसत नाही.फळे,भाजीपाला,मांस विक्रेते मास्क वापरतांना क्वचितच दिसत आहेत. गाव खेड्याच्या निवडणुका असो की शहरातील निवडणूक सर्व दूर खूपच कमी कार्यकर्ते मास्क चा वापर करतांना दिसले तर सोशल डिस्टनसिंग चा सर्वत्रच फज्जा उडत आहे. सक्तीचे कोविड केअर सेंटर बंद करून रुग्णांचे ,नातेवाईकांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने होम आयसोलेशन ची सुविधा पुढे आणली. मात्र प्रत्येकाच्या घरात स्वतंत्र खोली असतेच असे नाही त्यामुळे अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह होत आहे ,सोबतच त्यातील बरेच रुग्ण घरा बाहेर फिरतांना दिसतात. केंद्रीय समितीच्या पाहणीत देखील ही बाब लक्षात आली आहे. याचा अर्थ सक्तीचे कोविड केअर सेंटर मध्ये राहण्याची भीती मनात नाही, काही झाले तरी आपण होम आयसोलेशन ची सुविधा असल्याने घरीच राहू शकतो म्हणून लोक बेजबाबदारपणे बाहेर काम नसतांना फिरत आहेत आणि पॉझिटिव्ह होऊन देखील विनाकारण फिरतात हे त्याहूनही वाईट. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या का वाढत आहे यासाठी कोविड १९ चा विषाणू जुनाच आहे की नवीन स्ट्रेन चा आहे याची वरिष्ठ पातळीवर शास्त्रीय तपासणी करणे गरजेचे आहे.रुग्णसंख्या वाढीच्या या बाबी सर्वांनी गांभीर्याने घेतल्या पाहीजे.
शहरात रुग्णांना बेड उपलब्ध कसे होतील
गेल्या वर्षी मास्क,सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझर चा वापर करण्यात येत होता त्याचे आता पालन होत नसल्याने गाव खेड्यात देखील रुग्ण संख्या वाढतेय. जिल्ह्याभरातील सर्व रुग्णांना जळगावात चांगली सुविधा मिळेल असे वाटते त्यामुळे परगावातून रुग्णांचे जळगावात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसतेय.गेल्या वर्षी तालुकास्तरावर किंवा जळगावात देखील मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर उपलब्ध होते .आज त्याचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे.सामाजिक संस्था,संघटना यांनी तालुका स्थरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे तालुका स्थरावर किंवा प्रांत स्थरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे असलेली सुविधा उपलब्ध केल्यास जळगावात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल आणि रुग्णांना वेळीच तालुकास्थरावर लवकर उपचार मिळाल्यास मृत्युदर देखील कमी होण्यास मदत होईल. तालुका स्थरावरील खाजगी दवाखान्यांचा कोरोना उपचारासाठी सहभाग कसा वाढेल यावर देखील काम करणे गरजेचे आहे.
मनुष्यबळ कसे वाढेल
कोरोनाच्या या महामारीत वैद्यकीय उपचार करणारे योद्धे देखील कोरोनाग्रस्त होत असल्याने मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यासाठी शासन स्थरावर जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आली. जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव मधील कोरोना योद्धे लढा देत आहेत तसाच लढा,उपचार इतर पॅथीच्या महाविद्यालयात, हॉस्पिटलमध्ये देखील सुरू करणे आता गरजेचे वाटत आहे.आयुर्वेदिक, होमिओपॅथिच्या डॉक्टरांचा सक्रिय सहभाग या लढ्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास मनुष्यबळ नक्कीच वाढेल.
लॉकडाऊन वर्षपूर्ती
कोरोना रुग्णांवरील उपचारासोबतच जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या विविध प्रभागातील प्रत्येक रुग्णालयात लसीकरण सुविधा उपलब्ध केली पाहिजे त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व प्रायमरी हेल्थ सेंटर अंतर्गत असलेल्या सर्व सबसेंटर वर देखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. घराजवळ लसीकरण होत असल्याचे पाहून वयोवृद्ध गटातील लाभार्थ्यांची संख्या नक्कीच वाढेल. हर्ड इम्युनिटी लवकर तयार होण्यास मदत होईल आणि वाढीव नवीन रुग्ण संख्येवर आळा बसेल. लसीकरणाची मोहीम वाढावी यासाठी लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकसहभागा शिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही.
लॉक डाऊन-पुन्हा पर्याय?
१५-२० दिवसांचे लॉक डाऊन करून आपण आज असलेल्या परिस्थिती वर काही काळ आळा आणू शकतो आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण हलका करू शकतो त्यासोबतच पुढील नियोजन आखण्यासाठी वेळ मिळू शकतो.परंतु लॉक डाऊन हा अंतिम पर्याय नसल्याचे आपण अनुभवले आहे.आपणा सर्वांनी मास्क चा वापर करणे,सोशल डिस्टन्स पाळणे आणि सॅनिटायझर किंवा साबणाने वेळोवेळी हात धुणे हे त्रिसूत्री नियम पाळत कोरोनाला दूर ठेवायचे आहे.समाज्यातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे . लक्षणे आढळल्यास लवकर तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करणे गरजेचे आहे.प्रशासनाच्या आदेशानुसार पॉझिटिव्ह रुग्णांनी सक्तीने नियम पाळणे गरजेचे आहे.कोरोना विरुद्ध चा हा लढा केवळ प्रशासन किंवा कोरोना योद्धे यांचा नसून प्रत्येक व्यक्तीचा आहे.तेव्हा सर्वांनी नियम पाळा आणि कोरोना टाळा.
डॉ.धर्मेंद्र पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ,जळगाव