जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खाटांसह इतर बाबींचे व्यवस्थापन योग्य रीतीने होण्याकरिता जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी मंगळवारी २३ मार्च रोजी टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन नियोजन केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट दिली. प्रसंगी प्रशासनाचे टास्क फोर्सचे सदस्य, “शावैम” चे अधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपजिल्हाधिकारी तथा रुग्णालयाचे नोडल अधिकारी किरण सावंत पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. अरुण कसोटे उपस्थित होते. यावेळी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी किती विभाग उघडण्यात आले आहेत, किती रुग्णांवर उपचार सुरु आहेत आदी आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. शासकीय रुग्णालयात पूर्ण खाटा कोरोना रुग्णांसाठी सुरु करायला काय करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात आले.
रुग्णांसाठी वॉर रूम, खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे समन्वयाचे कामकाज सोपे जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी आयएमए व निमा संस्थेची काही मदत घेता येईल का यावर चर्चा झाली. कोविड झालेल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स व परिचारिकांच्या सेवा रुग्णांना उत्तम मिळत असल्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे सांगत टास्क फोर्स सदस्यांनी कौतुक केले. गणवेशातील डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता, खाटांवरील गाद्या, धुतलेल्या चादरी, जेवण, काळजीवाहक मदतनीस (बेड साईड असिस्टंट) हे वातावरण रुग्णालयात प्रसन्न करीत असल्याचे टास्क फोर्सने सांगितले.
रुग्णांना देण्यात येणारी औषधे आणि इंजेक्शन याविषयीची उपलब्धता किती आहे तसेच, रुग्णांना औषधोपचार करताना मार्गदर्शिकेच्या सूचना पाळाव्यात असे सांगण्यात आले. औषधांची उपलब्धता मुबलक ठेवावी अशा सूचना करण्यात आल्या. सध्या कोरोना महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून त्याला लवकर रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित समजून सांगितले पाहिजे. “शावैम” मधील रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित माहिती मिळत असल्याने नातेवाईक समाधानी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
काळजीवाहक मदतनीस (बेड साईड असिस्टंट) महत्वाची भूमिका बजावत आहे. हे असिस्टंट नातेवाईकांचे रुग्णांशी बोलणे करून देतात. रुग्णांची काळजी घेतात. त्यामुळे नातेवाईकांची चिंता कमी होते. त्यामुळे त्यांची संख्या आणखी वाढवून दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी ऑक्सिजन प्रकल्पाचाही आढावा घेतला. नाशिकच्या धर्तीवर मध्यवर्ती खाटा व्यवस्थापन पद्धत सुरु करण्याविषयी एकमत झाले असून त्यासाठी लवकरच यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील एकूण खाटा उपलब्धता किती आहे त्याविषयी माहिती वेळोवेळी उपलब्ध होईल. यावेळी टास्क फोर्सने विविध सूचना केल्या.
यावेळी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुशील गुर्जर, डॉ. लीना पाटील, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. राहुल महाजन, डॉ. निलेश चांडक, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. संदीप पटेल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. गिरीश राणे, डॉ. नरेंद्र पाटील, अधिसेविका कविता नेतकर उपस्थित होते.