चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील बसस्थानक परिसरात बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांपैकी एकाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तर दुसरा संशयित फरार झाला आहे. पोलीसांनी गावठी कट्टा, चोरीची दुचाकी आणि काडतूस हस्तगत केले असून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण भागवत कोळी (वय-२६) रा. बोरअंजटी ता.चोपडा असे अटक केल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील बसस्थानक आवारात दोन तरूणी दुचाकीवर गावठी बनावटीची पिस्तूल घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून प्रवीण भागवत कोळी याला अटक केली तर दुसरा संशयित आरोपी जगन बारेला, रा. जामठी, ता.वरला, जि. बडवाणी (मध्यप्रदेश) हा फरार झाला.
प्रवीण कोळी याच्या ताब्यातील २५ हजार रूपये किंमतीची गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ सुरज पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सोनवणे करीत आहे.