जळगाव : राज्य शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलात मिळालेल्या भरघोस सवलतीचा लाभ घेत बिल भरून थकबाकीमुक्त झालेल्या सहा ग्राहकांचा महावितरणच्या पायाभूत आराखडा विभागाचे कार्यकारी संचालक तथा सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कृषी ऊर्जा पर्वांतर्गत पाळधी उपकेंद्रात हा कार्यक्रम झाला.
या सहा ग्राहकांनी एकूण 1 लाख 64 हजारांचा वीजबील भरणा केला. त्यांना उर्वरित 50 टक्के वीजबील माफ करून थकबाकीमुक्तीचे सन्मानपत्र महावितरणकडून देण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करून ज्या शेतकऱ्यांना अजूनही योजनेचा लाभ घ्यायची इच्छा आहे, त्यांना 31 मार्च 2022 पर्यंत 50 टक्के सवलतीसह वीजबिले भरता येतील, असे सांगितले.
महा कृषी ऊर्जा अभियानात पथराड बु. येथील इंदुबाई अमृत पाटील यांनी 2 बिलांचे 53 हजार 290 रुपये भरले. त्यांच्या वतीने त्यांचे पती ज्येष्ठ शेतकरी अमृत तानकु पाटील यांनी या वेळी सत्कार स्वीकारला. तसेच निंभोरा येथील बाळू शंकर पाटील यांनी 36 हजार 690, जयवंत बाळू पाटील यांनी 18 हजार 610, टाहाकळी येथील रमेश श्रावण सूर्यवंशी यांनी 42 हजार 450 तर कैलास काशिनाथ देवरे यांनी 13 हजार रुपये भरून वीजबिल सवलतीचा आणि थकबाकीमुक्तीचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता फारुक शेख, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार, उपकार्यकारी अभियंता सुनील रेवतकर, सहायक अभियंता मोहन भोई, हर्षल नेहेते, ज्ञानेश्वर परदेशी, अविनाश पाटील तसेच पाळधी व चांदसरचे तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.


