जळगाव (दिलीप तिवारी) – जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेच्या नेतृत्त्वात सत्तांतर होणार हे निश्चित. सौ.जयश्री महाजन या महापौर, कुलभूषण पाटील हे उपमहापौर होणार हे ठरलेले आहे. यासोबतच स्थायी समितीच्या सभापतीपदी सुनील वामनराव खडके यांची वर्णी लागणार आहे. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत केला.
खडसे यांचा आग्रह होता की, खडके यांना उपमहापौरपद द्यावे. मात्र, मनपाच्या राजकारणात सामाजिक संतुलन कायम रहावे म्हणून कुलभूषण पाटील यांचे नाव अगोदरच निश्चित झाले होते. दि. 18 मार्च ला महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगाव मनपाच्या सभागृहात महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार व अनुमोदक असे सहा जणच शिवसेनेतर्फे उपस्थित राहतील. उर्वरित किमान 40 नगरसेवक हे ठाणे येथून सहभागी होतील.
या निवडणुकीत हात वर करुन मते मोजली जातात. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये विशेष सभेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वा त्यांनी नियुक्त केलेले प्राधृकृत अधिकारी केवळ नगरसेवक यांची ओळख स्वीकारुन मत नोंदवून घेतील. ही प्रक्रिया फारतर तासाभराची असेल. उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज मागे घेणे यासाठी फार-फार तर अर्धातास वेळ दिला जातो. त्यामुळे दोन्ही पदांसाठीची कार्यवाही तासाभरात आटोपेल. ही व्हिडीओ कान्फरन्सिंग कोणत्या अॅपद्वारे केले जाईल ते अद्याप निश्चित नाही. याविषयी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या नव्या सत्ता समिकरणात ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरुच आहे. कुलभूषण पाटील, चेतन सनकत आणि नवनाथ दारकुंडे यांना पुढील अडीच वर्षात आठ-आठ महिन्यांसाठी उपमहापौरपद आणि भली मोठी लाखांची रक्कम देण्याची ऑफर भाजपकडून दिली गेली आहे. याबरोबरच रंजना भरत सपकाळे यांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले जाईल असाही प्रस्ताव दिला गेला आहे.
गिरीशभाऊ काळजी घ्या!
जळगाव मनपातील भाजपचे नेते आणि संकटमोचक उपाधि लाभलेले गिरीशभाऊ महाजन यांचे कोरोनासदृश लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे श्री.महाजन हे जामनेर येथेच निवासस्थानी एकांतवासात असल्याचे निकटवर्तियांनी सांगितले. राजकारणाच्या धावपळीत श्री महाजन यांनी स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. कोरोना प्रतिबंधाची सर्व ती काळजी घ्यावी, अशी अपेक्षा समर्थकांनी व्यक्त केली आहे.