जळगाव- जुलै २०१९ मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर अखेर नवीन पूर्णवेळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तब्बल सव्वा वर्षांनंतर जिल्हा परिषदेला आरोग्य अधिकारी मिळाले आहेत. नवनियुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी. टी. जमादार यांनी मंगळवारी २७ रोजी पदभार स्वीकारले. डॉ. जमादार हे सोलापूर येथून बदली होऊन आले आहेत.
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांच्याकडून डॉ. जमादार यांनी पदभार घेतले. २६ जुलै २०१९ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली होती. त्यानंतर हे पद रिक्त होते. प्रभारी पदभार डॉ. दिलीप पोटोडे यांच्याकडे होते. जिल्हा परिषदेतर्फे सातत्याने शासनाकडे नवीन आरोग्य अधिकारी देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आले होते. अखेर त्याला यश आले असून नवीन आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण संख्या आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडे विशेष जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील पूर्ण आरोग्य यंत्रणा जिल्हा परिषद हाताळत असते. त्यामुळे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी होत होती.
जिल्हा परिषदेतील अनेक विभागात प्रभारी कामकाज सुरू आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आदी पदे रिक्त आहेत. याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणी जि. प. प्रशासनाने शासनाकडे केली आहे. दोन आठवड्यापूर्वी बांधकाम विभागाला नियमित कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.