जळगाव – जळगाव शहरात गुरुवारी रात्री ८ वाजेपासून झालेल्या जनता कर्फ्यूचा जोरदार फटका जळगाव तालुक्यातील शेकडो भाजी उत्पादक बांधवांना बसला असल्याने गरीब शेतकऱ्यांना हे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी केली आहे.
शहरात जनता कर्फ्यू सुरु असला तरी कृषी उत्पन्न बाजार समिती व भाजीपाला ठोक खरेदी-विक्री सुरु राहणार असल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी आपापल्या गाड्या भरून नेहमीप्रमाणे भाजीपाला जळगावला आणला. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु असून ही खरेदीसाठी ग्राहक नसल्याने शेतकऱ्याने वेगवेगळ्या गावांमधून विक्रीसाठी आणलेला लक्षावधी रुपये किमतीचा भाजीपाला उन्हामुळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी अखेर तो बाजार समितीच्या आवारातच फेकून द्यावा लागला. तसेच अनेक शेतकरी बांधवांनी गोशाळेमध्ये जाऊन गुरांसाठी चारा म्हणून भाजीपाला देऊन दिला. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आज नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले. कोरोना महामारीमुळे भाजीपाला उत्पादक आधीच प्रचंड आर्थिक संकटाशी झुंजत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकसंघर्ष मोर्चाकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश करून मजुरी द्यायची आहे ती कुठून द्यायची? असा संतप्त सवाल यावेळी व्यक्त केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री सुरु ठेवणे आणि किरकोळ भाजी मार्केट बंद ठेवणे हे परस्पर विरोधाभासी निर्णयामुळे ही चूक पूर्णपणे प्रशासनाची आहे. त्यामुळे सर्व भाजीपाला उत्पादकांना तात्काळ नुकसानभरपाई देऊन शासनाने संवेदनशीलता दाखवावी, अशी आग्रही मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे.
यावेळी सचिन धांडे, योगेश पाटील, भरत कर्डिले नरेंद्र महाजन, सोमनाथ पाटील, समाधान पाटील यांच्या सह्या असून संबंधित निवेदनात अधिकाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आणून देत नुकसानीची जबाबदारी घेण्याचे आव्हान करत शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.