मुंबई, वृत्तसंस्था : MPSCची परीक्षा देण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला वयाच्या मर्यादेचं बंधन येणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
“14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. उद्या (शुक्रवारी) ही तारीख जाहीर होईल. तसंच आठवडाभरातच ही परीक्षा होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
“कोरोना वाढत आहे. लॉकडाऊन भागात असलेल्या परीक्षा केंद्राबाबत निर्णय घेण्यासाठी थोडा अवधी पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आणखी वेळ पाहिजे असल्याचं सांगितलं आहे.
गेल्यावर्षी दिवाळीच्या आधी परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. त्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. यापुढे तारीख पुढे ढकलणार नाही, असं तेव्हा सांगण्यात आलं होतं, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली आहे.
राज्याचा कर्मचारी वर्ग सध्या कोरोनाच्या कामात व्यग्र आहे. परीक्षेसाठी देण्यात येणारे कर्मचारी हे कोरोना निगेटिव्ह असले पाहिजेत, त्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असं ठाकरे म्हणालेत.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पुण्यात रस्त्यावर जमलेल्या विद्यार्थ्यांनी माघारी जाण्यास सुरुवात केली. साडेनऊनंतर मात्र पुण्यातला आंदोलनाचा परिसर बऱ्यापैकी रिकामा झाला होता.
“पुढच्या आठवड्यात जर कोरोनाचे पेशंट वाढले तर काय करणार,” असा प्रश्न आता विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
“सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरचा खून करत आहे,” अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर दिली आहे.
तसंच आज रात्री पुण्याच्या रस्त्यांवरच आंदोलन करणार असल्याची घोषणा पडळकर यांनी केली. जोपर्यंच परीक्षा 14 तारखेलाच घेण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होत.
पण पोलिसांनी मात्र गोपीचंद पडळकर आणि त्यांच्याबरोबर आंदोलन करत असलेल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.