जळगाव – शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू, गुटखा न दिल्यास आत्महत्येची धमकी देणाऱ्याला महापौर सौ.भारती सोनवणे यांनी चांगलाच दम दिला. मद्यपीकडून दारूच्या ४ बाटल्या, गुटखा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मद्यपीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून महापौर सौ.भारती सोनवणे रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक मद्यपी गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांना मिळताच त्या तात्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौरांनी केली कानउघडणी
मनपाच्या कोविड केअर सेंटर इमारत क्रमांक ४ मध्ये आईसह उपचारार्थ दाखल असलेल्या अविनाश पाटील या तरुणाने बाहेरून दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. तसेच मला दारू आणि गुटखा न दिल्यास मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी तो देत होता. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्याला खाली बोलवत चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्याच्या ताब्यातील ४ दारूच्या बाटल्या आणि गुटखा देखील काढून घेतला.
गुटखा घेऊन पळाला, खोलीला लावली कडी
महापौर सौ.भारती सोनवणे या मद्यपीला खडसावत असतानाही त्याने मद्यप्राशन केलेले होते. महापौरांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याने टेबलावर ठेवलेली गुटख्याची पुडी उचलून वर पळ काढला आणि स्वतःच्या खोलीत जात आतून कडी लावून घेतली. मद्यपी इतक्यावरच थांबला नाही तर खोलीतून तो पुन्हा पुन्हा आत्महत्येची धमकी देत होता.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या अविनाश अरुण पाटील याच्यासह कोविड केअर सेंटरच्या बाहेर जाऊन परत येणाऱ्या गजानन विजय काकडे, प्रसन्न प्रदीप सराफ यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात डॉ.विजय घोलप यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिले आह.
मद्यपी रुग्णाची मुजोरी आणि महापौरांचा दणका!
जळगाव शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये महापौर सौ.भारती सोनवणे या पाहणी करण्यासाठी गेल्या असता एक कोरोना रुग्ण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. कोरोना रुग्ण बाहेर जाऊन दारू घेऊन आला असल्याचा प्रकार समोर आल्याने महापौरांनी त्याला चांगलेच खडसावले. महापौरांनी मद्यपीकडून ४ दारूच्या बाटल्या आणि गुटख्याच्या पुड्या जप्त केल्या. मुजोर मद्यपीला जाब विचारत असताना गुटख्याच्या पुड्या घेऊन त्याने खोलीत पळ काढला. संबंधित मद्यपी रुग्णाने खोलीला आतून कडी लावून आत्महत्येची धमकी दिली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्या रुग्णावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.