जळगाव – शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये स्वब दिल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरीही त्यावर विश्वास न ठेवता तो अहवाल खोटा असल्याचे सांगत मनपाची माध्यमातून बदनामी केल्याने एका नागरिकावर आणि माध्यम प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी याबाबत सूचना केल्या होत्या.
आदर्श नगरातील रहिवासी असलेले अनिल गोपीचंद नाथानी वय-५७ यांनी दि.२२ फेब्रुवारी रोजी मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्ट केली होती. अँटीजन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आली परंतु नाथानी यांना लक्षणे असल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. नाथानी यांचा अहवाल दि.२६ रोजी पॉझिटिव्ह आला असल्याबाबत त्यांना मनपाकडून कळविण्यात आले होते.
नाथानी यांनी ९९ महाराष्ट्र या ऑनलाइन पोर्टलचे प्रतिनिधी प्रकाश पाटील यांच्यामार्फत मनपाने खोटा अहवाल दिला असल्याचे वृत्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित केले होते. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सत्य असतानाही नाथानी हे बाहेर फिरून इतर खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा खाजगी लॅबमध्ये चाचणी करण्यास गेले. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दि.२६ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान मनपाची बदनामी करून समाजात गैरसमज पसरवला. मनपाची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या होत्या. महापौरांच्या सुचनेनंतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांच्या फिर्यादीवरून अनिल नाथानी व प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.