जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर इच्छादेवी चौकाजवळून सिद्धिविनायक हॉस्पिटलजवळ भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीच्या दोन जणांपैकी एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील आंबेडकर वसतीगृह येथील सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५) हे रेमंडमध्ये प्रॉडक्शन विभागात नोकरीला आहेत. ते रेमंडमधील सहकार्यासोबत दररोज कामावर जात होते. या अनुषंगाने आज सकाळी त्यांना अक्षय विजय पाटील (३०, रा. वढोदा, ता. चोपडा; ह.मु. शिवमनगर, जळगाव) हे सहकारी त्यांना घेण्यासाठी सिंधी कॉलनी भाजीपाला मार्केट येथे आले. येथून दोन्ही जळ दुचाकीने रेमंड कंपनीत जात असतांना इच्छादेवी चौकाच्या पुढे असणार्या सिध्दीविनायक हॉस्पीटलजवळ महामार्गावर अक्षय पाटील चालवत असलेल्या दुचाकी एमएच१९ सीसी ६७७७ क्रमांकाच्या दुचाकीला एमपी ०४ जीए ३४९२ या क्रमांकाच्या डंपरने मागून उडविले.
यात दुचाकीच्या मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे हे जागीच ठार झाले असून अक्षय पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. मोरे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. वाळू वाहतूक करणार्या भरधाव वेगाने धावणार्या डंपरनी आजवर शहरात अनेक बळी घेतले असून आज पुन्हा एक बळी गेला आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.