नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्राहकांना एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) वेळेवर मिळण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील नवे नियम सरकार लागू करणार आहे. त्यानुसार, आता ग्राहक एका डीलरऐवजी (Dealer) कोणत्याही तीन डीलरकडून एलपीजी सिलिंडरचं बुकिंग करू शकतील. म्हणजेच तुम्ही एखाद्या डीलरचे नोंदणीकृत ग्राहक असाल, त्या डीलरकडून वेळेत गॅस सिलिंडर उपलब्ध होणार नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या दुसऱ्या गॅस डीलरकडूनही सिलिंडर घेऊ शकणार आहात. अनेकदा असं होतं, की डीलरकडे गॅस सिलिंडरचा तुटवडा असतो. त्यामुळे नंबर लावूनही वेळेत सिलिंडर मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते.
ही अडचण लक्षात घेऊन आता अशा वेळी दुसऱ्या डीलरकडून सिलिंडर घेण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे.
ऑइल सेक्रेटरी तरुण कपूर (Tarun Kapoor) यांनी सांगितलं, की केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसच्या नव्या जोडणीसंदर्भातही (New Gas Connection) नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार ग्राहकांना कमी कागदपत्रांमध्ये गॅसची नवी जोडणी मिळू शकेल. अॅड्रेस प्रूफ अर्थात निवासाच्या पत्त्याशिवायही नवी गॅस जोडणी देण्याच्या संदर्भातही विचार सुरू आहे. सध्या एलपीजीच्या (LPG) नव्या जोडणीसाठी अॅड्रेस प्रूफ (Address Proof) अत्यावश्यक असतं. शहरात राहणाऱ्या अनेकांकडे हा कागद नसतो. गावाकडून तो कागद आणणं मुश्कील असतं. त्यामुळे त्याशिवाय जोडणी देण्याबद्दल विचार सुरू असल्याचं तरुण कपूर यांनी सांगितलं.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये तरुण कपूर यांनी सांगितलं, की येत्या दोन वर्षांत एक कोटीहून अधिक निःशुल्क एलपीजी कनेक्शन देण्याची, तसंच स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी अगदी सुलभ पद्धतीने मिळण्याची योजना तयार करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत आठ कोटी एलपीजी सिलिंडर कनेक्शन देण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री उज्ज्वला (Ujjwala Scheme) योजनेअंतर्गत देशात एक कोटी गॅस कनेक्शन मोफत दिली जातील, अशी घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केली होती. ही संख्या दोन कोटींपर्यंत वाढवण्याचं सरकारचं नियोजन आहे. बजेटमध्ये त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आलेली नाही. सध्या जी सबसिडी सुरू आहे, त्यातून कनेक्शन देण्याचं काम पूर्ण होईल. अद्याप किती लोकांकडे गॅसचं कनेक्शन नाही, याचा अंदाज सरकारने लावला आहे. ती संख्या साधारण एक कोटीच्या आसपास आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत 29 कोटी लोकांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आलं आहे.
स्वच्छ, प्रदूषणरहित इंधन देशातल्या सगळ्या म्हणजे 100 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट गाठण्याची ही योजना तयार करण्यात आली आहे. ऑइल सेक्रेटरी तरुण कपूर यांनी सांगितलं, की केवळ चार वर्षांत गरीब महिलांच्या घरात विक्रमी आठ कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आली. त्यामुळे देशातल्या एलपीजी वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 29 कोटी झाली. एक कोटी कनेक्शन दिल्यानंतर आपण 100 टक्के घरांपर्यंत एलपीजी पोहोचवण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू. अर्थात, एक कोटी या संख्येत बदल होऊ शकतो, हा मुद्दाही त्यांनी मांडला. कारण काळानुसार अनेक परिवार रोजगार किंवा अन्य कारणांमुळे दुसऱ्या शहरात गेलेले असू शकतात.
सिलिंडर बुकिंगसाठी नंबर
इंडियन ऑइलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी अगोदर देशाच्या वेगवेगळ्या सर्कल्समध्ये वेगवेगळे मोबाइल नंबर होते. आता देशातल्या या सर्वांत मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सगळ्या सर्कल्ससाठी एकच नंबर जाहीर केला आहे. इंडेन गॅसच्या देशभरातल्या गॅस ग्राहकांना एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी आता 7718955555 या क्रमांकावर कॉल करावा लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.