जळगाव – जळगाव मधील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी केली आहे.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे, फिरोज तडवी, फरीद मुशिर खान, प्रतिभा भालेराव, साहिल पठाण, आबिद नाजी शेख, वर्षा लोहार, फारूख कादरी, वासंती दिघे यांच्या स्वाक्षऱ्या असुन निवेदनात म्हटल्यानुसार वृत्त असे की, आशादिप महिला सुधारगृहात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरूषांना अनधिकृतपणे प्रवेश दिला जात आहे. पोलीस कर्मचारी हे वसतीगृहातील अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर आत प्रवेश करून वसतीगृहातील महिला व तरूण मुलींसोबत गैरव्यवहार करत आहे.
सोमवारी १ मार्च २०२१ रोजी वस्तीगृहामध्ये काही पोलीस कर्मचारी व अनोळखी पुरूष यांनी प्रवेश करून मुलीसोबत अश्लिल चाळे करून नृत्य करण्यास भाग पाडले. यावर मुलींनी नकार दिल्याने त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात सामाजिक कार्यकत्या मंगला सोनवणे सह इतर कार्यकर्त्या गेल्या असता वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुलींना भेटू दिले नाही. त्यावेळी वसतीगृहात असलेल्या वरच्या मजल्यात राहत असलेल्या मुलींनी खिडकीतून आरडाओरड करून सांगितले की, आम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलू द्या. मात्र वस्तीगृहातील पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्त्या यांना बोलू दिले नाही आणि मुलीना बोलू न देण्याबाबत दबाव टाकत होते. दरम्यान, आशदिप वसतीगृहात चाललेल्या या गोरखधंद्याची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.