जळगाव – शहरातील वाघनगर परिसरातील साई संस्कार कॉलनीत राहत असलेला व पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी सुनील सैंदाणे हा घरासमोर ओपनस्पेसमध्ये मद्यप्राशन करुन नागरिकांना शिवीगाळ करतो तसेच दमदाटी करत धिंगाणा घालत असतो त्यामुळे याबाबत परिसरातील रहिवासी तथा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी यांनी आज १ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून संबंधित पोलीस कर्मचार्यावर कारवाईची मागणी केली आहे.संबंधित कर्मचार्यांचा धिंगाणा घालतांनाचा व्हिडीओही पेन ड्राइव्ह मध्ये तडवी यांनी निवेदनासोबत अधिकार्यांना दिला आहे.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले की, तडवी राहत असलेल्या घरासामेर काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी सुनील सैंदाणे हे राहण्यासाठी आले आहेत. सैंदाणे हे कॉलनीच्या ओपन स्पेसमध्ये मद्यप्राशन करुन नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी, तसेच जोरजोरात आरडाओरड करुन भांडणे करतात. २२ फेब्रुवारी रोजी असाच प्रकार घडला. नेहमीच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचार्याला समज देण्यासाठी तडवी यांनी त्यांच्या कॉलनीतील रहिवाशांची मीटींग बोलावली. मात्र यावेळी सदरचा पोलीस उपस्थित राहिला नाही. याउलट तडवी यांनी मीटींग बोलवण्याचा राग आल्याने पोलीस कर्मचारी सैंदाणे याने तडवी यांना व्हॉटस्ऍपव्दारे खाकीला दुखावू नका, पोलीस पित नाही, पगार नाही तो पुरत पोलिसाला,असे मेसेज पाठविले. संबंधित दारु पिऊन सार्वजनिक ठिकाण गोंधळ घालणार्या, कॉलनी मधील रहिवाश्यांना शिवीगाळ व दमदाटी तसेच आरडाओरड करणार्या व खाकीचा दम देणार्या पोलीस सुनील सैंदाणे यांचे विरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच त्याची विभागीय चौकशी करुन शिस्तभंगविषयक कारवाई करण्यांत यावी असे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीचे निवेदन तडवी यांनी रहिवाशांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना दिले आहे.