जळगाव प्रतिनिधी । नाशिक येथे उपचारासाठी कार ने जात असलेल्या जुने जळगावातील कुटुंबियाला दुचाकी ने येत असलेल्या दोन संशयितांनी लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघे संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने जळगावातील विठ्ठल पेठेमधील रहिवाशी योगेश सुरेश साळुंखे (वय-३७) हे खासगी नोकरी करतात. त्यांचे वडील सुरेश प्रतापराव साळुंखे हे गॅरेज मेकॅनिक काम करतात. त्यांना सुमारे सात ते आठे महिन्यांपासून कमरेचा त्रास असल्यामुळे ऑपरेशन करण्यासाठी आज २८ फेब्रुवारी रोजी दुपारी नाशिक येथे जाण्यासाठी कार क्रमांक (एमएच १९ एचके ३३९५) निघाले. कार अरूण साळुखे चालवत होते सोबत आई लताबाई तर उर्मिलाबाई व वैशाली साळुंखे या दोन्ही काकू असे सहा जण होते. दुपारी १.४० वाजेच्या सुमारास डीमार्ट समोर आल्यावर पाठीमागुन एक मोटार सायकलवर दोनजण येवून गाडीसमोर आडवे झाले. आणि इच्छादेवी चौकात आम्हाला साईड का दिली नाही म्हणून कार चालक अरूण साळुंखे यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबियांनी संशयितांना समजविण्याचा प्रयत्न केला
त्यावेळी दोघांना कार मधील सर्वांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता एकाने सुरेश साळुंखे आणि अरूण साळुंखे या दोन्ही भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच लताबाई यांच्या हाताचे बोटास दुखापत केली. हा प्रकार होत असतांना एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, किशोर बडगुजर यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता हेमंत संतोष चौधरी व जगदीश संतोष चौधरी दोन्ही रा. आदर्शन नगर मोहाडी रोडवर जळगाव असे असल्याचे समोर आले. याप्रकरणी योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.