नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात मार्च 2021 पासून 4 मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. या नव्या नियमानुसार तुम्हाला आणखी एक दिलासा मिळणार आहे तर काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते. यामध्ये ज्येष्ठांना कोरोना लस, सरकारच्या ‘विवाद से विश्वास’ ची शेवटची तारीख, बँक ग्राहकांच्या IFSC कोड यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
ज्येष्ठांना कोरोना लस
भारतासह जगभरात कोरोनाविरोधात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम वेगाने सुरु आहे. या महामारीमुळे फक्त देशातील नाही तर जगाची चिंता वाढली आहे. मात्र, आता देशातील 60 वय वर्षांपेक्षा जास्त लोकांना येत्या मार्च महिन्यापासून कोरोनावरील लस दिली जाणार आहे.
याशिवाय यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पण गंभीर आजार असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. पुरवठा आणि मागणी यानुसार हे लसीकरण केले जाणार आहे.
‘विवाद से विश्वास’ या योजनेची तारीख
भारत सरकारने ‘विवाद से विश्वास’ या योजनेची तारीख वाढवली आहे. प्रत्यक्ष कर विवाद समाधान योजनेंतर्गत करसंबंधित घोषणा दाखल करण्यासाठी 31 मार्चपर्यंत कालावधी दिला आहे. याशिवाय फीसाठी 30 एप्रिलपर्यंत वाढ दिली आहे.
‘या’ बँकांच्या IFSC कोडमध्ये होणार बदल
जर तुमचे अकाउंट बँक ऑफ बडोदामध्ये आहे तर तुम्हाला फायदा होईल. एक एप्रिल 2019 पासून विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता हे सर्व ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनले आहेत. या सर्व ग्राहकांना नवे IFSC कोड दिले जाणार आहे. एक मार्चपासून ग्राहकांना जुना IFSC कोड वापरता येणार नाही.
पाचवीपर्यंतच्या शाळा उघडणार
एक मार्चपासून उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांत पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. हे विद्यार्थी ऑफलाईन शिक्षणासाठी शाळेत येऊ शकतात. त्यानुसार, शाळेनेही तयारी सुरु केली आहे. मात्र, या शाळांना कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.