जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह लोणेरेच्या कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागणे याला विद्यापीठ विकास मंचची दडपशाही कारणीभूत आहे. डॉ.पी. पी. पाटील यांच्या माध्यमातून एक चांगले व्यक्तीमत्व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला लाभले होते. मात्र त्यांना बळीचा बकरा व्हावे लागले आहे. मुदत संपण्यापूर्वीच कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागणे हा विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाला एक कलंक आपल्या खान्देशाला लागलेला आहे, पुढील कुलगुरूंनी विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाऱ्यापासून चार हात लांबच रहावे अशी महत्वाची प्रतिक्रिया अधिसभा सदस्य आणि माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.
विष्णू भंगाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, विद्यापीठातील हुकूमशाही कारभाराला कंटाळून पाटील यांनी राजीनामा दिला आहे. प्रत्येक गोष्टीतील निर्णयात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. विद्यापीठातील अनेक यंत्रणा त्यांचे काही ऐकत नव्हती. व्यवस्थापन परिषद सदस्य असले तरी विद्यापीठाचा कारभार दिलीप रामू पाटील चालवायचे.
अप्रत्यक्षपणे कुलगुरूपदाचा कार्यभार दिलीप पाटील आणि विद्यापीठ विकास मंच पाहायची. या कारभाराला डॉ. पी.पी. पाटील कंटाळले होते. पाटील सर चांगले व्यक्तिमत्व होते. या चांगल्या व्यक्तिमत्वाला काम करू दिले गेले नाही. त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. राजीनाम्यांनंतर दिलीप पाटील म्हणतात की, आम्हाला विचारून राजीनामा दिलेला नाही. म्हणजे केवढी दडपशाही म्हणावी ? कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठ मंचाला न विचारता राजीनामा दिला हा सर्वात मोठा निर्णय आहे. राज्यात भाजपच्या सत्तेवेळी नियुक्त झालेल्या राज्यातील काही कुलगुरुंची, अधिकाऱ्यांची पात्रता तपासावी. त्यातून काही कुलगुरुंची सत्यता बाहेर येईल. कुलगुरूंच्या राजीनाम्याचे कारण समोर येईल.
राज्यातील दोन कुलगुरूंनी दिलेला राजीनामा हा चिंताजनक आहे. विद्यापीठात काही अप्रिय घडू नये म्हणून दूरदृष्टी ठेवून डॉ. पाटील यांनी राजीनामा दिला आहे. तसेच, राज्य शासनाला देखील या राजीनाम्याच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून होत आहे. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात उच्च शिक्षण क्षेत्रात प्रगती पाहायला मिळाली आहे. मात्र भाजपच्या सत्तेच्या मागील काळात नियुक्त झालेल्या कुलगुरूंना विद्यापीठ विकास मंच काम करू देत नाही, म्हणून राजीनामे राज्यपालांकडे देण्याचा दुःखद निर्णय दोघं कुलगुरूंना घ्यावा लागला आहे.
तसेच, आता अतिरिक्त कार्यभार म्हणून डॉ. इ. यांच्याकडे पदभार राजभवनाने सोपवला आहे. त्यांना तरी आता विद्यापीठ विकास मंचने त्रास देऊ नये अशी अपेक्षा शेवटी विष्णू भंगाळे यांनी व्यक्त केली आहे.