जळगाव प्रतिनिधी । शहरातील जीवन विकास कॉलनीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची वृत्तसमोर आली आहे. पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार करण्याचा फटका एका महिलेला पडला असून तिच्या खात्यातून ५० हजार लांबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव शहरातील जीवन विकास कॉलनीमध्ये राहणार्या सिमी शरद दुबे यांनी डॉमिनोज पिझ्झा येथून पिझ्झा, केक व गार्लिक ब्रेड खरेदी केले. ऑर्डरनुसार पिझ्झा व केक मिळाले नसल्याचे त्यांना घरी आल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गुगलवर डॉमिनोज पिझ्झा जळगाव नावाने सर्च करून मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधला. या वेळी समोरून बोलणार्याने डॉमिनोज पिझ्झा येथून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून तक्रार ऐकून घेतली. यानंतर त्याने दुबे यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली. सिमी दुबे यांनी या लिंकवर जाऊन डेबिट कार्ड व सीव्हीव्ही क्रमांक टाकून डिलिव्हरी बॉयसाठी १५ रुपये चार्ज दिला. नंतर त्याने पुन्हा एक लिंक पाठवून एक अॅप इन्स्टॉल करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी ते अॅपही इन्स्टॉल केले. त्याने दिलेला मोबाइल क्रमांकही त्यांनी अॅप्लिकेशनमध्ये टाकायला सांगितला. डिलिव्हरी बॉय येईपर्यंत ते अॅप्लिकेशन डिलिट न करण्यासही सांगितले. यानुसार त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये संबंधीत अॅप राहू दिले. त्यानंतर त्यांना आपल्या मोबाइलवर बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतल्याचा संदेश प्राप्त झाला. यामुळे चुकीच्या क्रमांकावर तक्रार करण्याचा मोठा फटका या महिलेस बसल्याचे दिसून आले आहे.