मुंबई, वृत्तसंस्था | यंदा कोरोनामुळे 10वी आणि 12वी च्या परीक्षा होणार की नाही यावर अनेक चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या. अखेर याला पुर्णविराम लागला आहे. शिक्षण विभागाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद कराव्या लागल्या होत्या. तर परीक्षा लेखी होणार की ऑनलाईन असा देखील प्रश्न पडला होता.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं संभाव्य नवे वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. त्यानुसार 10वी च्या विद्यार्थांची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे च्या दरम्यान होणार आहे. तर 12 वी च्या परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे च्या दरम्यान होणार आहे. या परीक्षा दोन सत्रात होणार असून सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यत तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 अशी वेळ असणार आहे.
ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेच वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात आलं आहे. आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यत लेखी सुचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुचनेनुसार हे वेळापत्रक अंतिम करण्यात आलं आहे. तर येेत्या काळातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळातर्फे या परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय सरकारच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचं पालन विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे.