जळगाव : वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याने महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करून १०० टक्के वसुली करावी, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी दिले. तसेच वसुलीत हयगय करणाऱ्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव परिमंडळांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडळातील अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (२५ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत गोविंद बोडके यांनी वीजबिलांची थकबाकी व वसुलीचा सविस्तर आढावा घेतला. महावितरण ही शासनाचा एक भाग असल्याने नागरिकांशी सौजन्याने वागून त्यांना समाधानकारक सेवा देणे आवश्यक आहे. त्यासाठी वीजगळती आणि वीजबिलांची थकबाकी नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंद्रित करा.
मागील १० महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी १०० टक्के वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नाही. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई प्रभावीपणे करा. थकबाकीदारांचे वीजमीटर काढून आणा. येत्या तीन दिवसांत सर्व व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची वीजबिल वसुली करा अथवा वीजपुरवठा खंडित करा. महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवा तसेच या अभियानात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी व भरघोस सवलतीची माहिती देऊन त्यांना थकबाकीमुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करा, असे निर्देश बोडके यांनी दिले.
सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांचे आज जळगाव परिमंडळ कार्यालयात प्रथमच आगमन झाले. त्यानिमित्त त्यांचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी बैठकीच्या सुरुवातीस पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीला मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर, प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.