अहमदाबाद, वृत्तसंस्था : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात आज पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील झगडियामध्ये असलेली केमिकल कंपनी यूपीएल-५ प्लांटमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत जवळपास २४ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
यूपीएल-५ प्लांटमध्ये मंगळवारी रात्री दोन वाजता स्फोट झाला. त्यानंतर प्लांटमध्ये आग लागली. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या सीएम नावाच्या प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. स्फोट इतका मोठा होती की त्याचा आवाज १५ किलोमीटरपर्यंत गेला. स्फोटानंतर परिसरातील गावांमध्ये भूकंप झाल्यासारखे जाणवले आणि लोक घरातून बाहेर पडले.
Massive blast in UPL-5 company’s plant at Jhaghadiya in Bharuch district. Blast heard in over 10 km radius. Locals from Dadheda, Jhagadia and other areas witnessed earthquake like shaking. pic.twitter.com/RO39AX9fq1
— DeshGujarat (@DeshGujarat) February 22, 2021
या दुर्घटनेत २४ कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारांसाठी भरूच आणि बडोदामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटाने कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाकडून सुरू आहेत. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, स्फोटामुळे यूपीएल कंपनीजवळ असलेल्या दढेडा, फुलवाडी आणि करलसाठी गावांमधील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात भरूचमधील पटेल ग्रुपच्या केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला होता. हा स्फोट स्टोरेज टँकमध्ये झाला होता. त्यावेळी स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास ७७ लोक जखमी झाले होते.