मुंबई, वृत्तसंस्था | तब्बल सात वेळा खासदार राहिलेले दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर यांच्या आत्महत्येचे एकच खळबळ उडाली असताना आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही सरकारी अधिकारी तसेच मंत्र्यांची नावं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
डेलकर हे मुंबईतील ग्रीन साऊथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर थांबले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चालकाने फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र तो झाला नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कळवलं. कुटुंबियांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, अखेर पोलिसांना कळवण्यात आले, त्यानंतर त्यांच्या चालकाने शेजारच्या रुममधील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारल्यानंतर डेलकर यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं.
डेलकर यांच्या मृतदेहाशेजारी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईट नोट देखील आढळली आहे, यामध्ये काही गुजराती अधिकारी तसेच बड्यांची मंत्र्यांची नावं असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत, मात्र पोलिसांनी अद्याप या नावांबाबत कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
दरम्यान, डेलकर यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत स्पष्टता होऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे.