जळगाव :- जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. तर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली असून याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज जारी केले आहेत.
जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शनिवारीच दिले होते. यानंतर शनिवारी सायंकाळी आणि रविवारी रूग्णसंख्येत वाढ झाली.
या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून कडक कारवाईचे निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अर्थात या सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई होणार आहे.
दरम्यान, गरज पडल्यास शाळा बंद करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी आधीच दिले होते. यानुसार जिल्ह्याधिकार्यांनी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेस बंद करण्याचे आदेश देखील जारी केले आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी निकराचे प्रयत्न केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी होऊन संसर्ग देखील कमी झाला होता. यानंतर आता देखील त्यांनी संयुक्त रितीने प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चाप
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून दोन दिवसांपासून धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्यांना चाप बसला असून प्रशासनातील सर्व घटकांचे मनोधैर्य उंचावले आहे. यामुळे कालपेक्षा आज जिल्हाभरातील कार्यक्रमांमध्ये नियमांचे पालन होत असल्याचे चित्र दिसून आले. जिल्हाधिकारी अॅक्शन मोडमध्ये आल्यामुळे हे शक्य झाल्याचे दिसून आले आहे. या पाठोपाठ आता कठोर प्रशासकीय उपाययोजना जाहीर केल्यामुळे कोरोनाच्या आपत्तीला आळा बसू शकतो.
जिल्हाधिकार्यांनी खालीलप्रमाणे निर्देश जारी केले आहेत.
१) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित रहावे.
२) अभ्यासिका ( लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५०% क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील.
३) सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रम यांना बंदी राहील.
४) सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ १० लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरीता खुली राहतील.
५) सर्व प्रकारचे सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
६) सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रम यांना बंदी राहील. तसेच सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील.
७) जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत.
8) कायद्याव्दारे बंधनकारक असणार्या वैधानिक सभांना केवळ ५० लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील. तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहील. मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगांव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सुट राहणार आहे.
९) लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करतांना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभिर्याने दक्षता घ्यावी.
१०) सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचार्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कोविड-१९ ची लक्षणे दिसून येणार्या संशयित कर्मचार्यांची कोविड-१९ चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.
११) संपूर्ण जळगांव जिल्हयात रात्री १०.०० वाजेपासून सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) घोषित करण्यात येत आहे. मात्र या संचारबंदी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार ( तथापि संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील); बाहेर गावाहून येणार्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहील. मात्र ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येईल. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदा. पेट्रोलपंप, गॅरेजेस यांना देखील सूट राहील.
१२) गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी राहील. मात्र केवळ ५ लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल.
सदरचा आदेश हा सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी पारीत करण्यात येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत.