जळगाव प्रतिनिधी । जळगावातील ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीत कर्मचारी भरतीवेळी विजय प्रकाश पाटील या कर्मचार्याच्या नियमित वेतन श्रेणीचा बनावट आदेश काढून फसवणूक केल्याप्रकरणी माजी अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे या दोघांविरुध्द तत्कालीन अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ८ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संशयित माजी अध्यक्ष विलास यादवराव नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर शनिवारी न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्यासमोर कामकाज झाले. युक्तीवादाअंती दोघांचे अटकपूर्व जामीन नामंजूर केले. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल अॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.