जळगाव: माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या प्रकारावर संशोधन केले पाहिजे, अशी खोचक टिप्पणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली.
एकनाथराव खडसे यांना वारंवार कोरोनाची लागण
ते रविवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथराव खडसे यांना वारंवार कोरोनाची लागण होत असल्याविषयी शंका उपस्थित केली. संपूर्ण राज्यात कोरोना आहे. पण आमच्या जळगाव जिल्ह्यात वेगळ्याच प्रकाराच कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे. एका व्यक्तीला तीन-तीन वेळा त्याची लागण होत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी असे मी म्हणणार नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
शास्त्रज्ञांना सांगून संशोधन करायला सांगा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत मी आमच्या जिल्ह्याची अधिक काळजी घेण्याची मागणी केली होती. हा कोरोनाचा नेमका कोणता प्रकार आहे, यासाठी शास्त्रज्ञांना सांगून संशोधन करायला सांगा. त्याचा नायनाट करून तो पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, असे मी सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहाप्रकरणी सक्तवसुली संचलनायाने काही दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांचा चौकशीचे समन्स धाडले होते. मात्र, या चौकशीपूर्वीच एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी मुदत मागून घेतली होती.
ठाकरे सरकारमधील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याला कोरोनाची लागण होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तर 10 राज्यमंत्र्यांपैकी 7 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. म्हणजेच 43 पैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे तर काहीजण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती.