जळगाव – राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ना.पाटील हे काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात येऊन गेले असून हजारो नागरिक, राष्ट्रवादी आणि संबंधित पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क आला आहे. हाय रिस्क गटात येणाऱ्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आला आहे. ना.पाटील हे दि.१२ व १३ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले असून पक्षाची महासंवाद बैठक, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, निवेदने देणाऱ्यांची गर्दी, सामान्य नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संबंधित पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क आला आहे. ना.पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्ती हाय रिस्क गटात मोडत असून त्यांनी स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील कोरोना संसर्ग बऱ्याच कालावधीनंतर आटोक्यात आला असून पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.