नाशिक, वृत्तसंस्था : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील.
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, नाशिकमधील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये पुन्हा फलक लावण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनाचा एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे.
नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असताना पुणे जिल्हा हा हॉटस्पॉट बनला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मुंबईतील चार भागात वाढती रुग्णसंख्या
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
कुठे किती रुग्णसंख्या?
चेंबूर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्यावाढीचा दर सर्वाधिक- 0.26% एवढी आहे. अंधेरी, जोगेश्वरीमध्ये 334, मुलुंडमध्ये 289, बोरिवलीत 402 आणि टिळक नगर, चेंबूरमध्ये 172 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.