मुंबई, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होते आहे. सलग 10 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानं सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आजही मुंबईत पेट्रोलमध्ये 29 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलही 31 पैशांनी वधारले आहे. मुंबईत आज पेट्रोल 96.27 रुपये आहे तर डिझेल 87.27 रुपये बघायला मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात नियंत्रणात आणून दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होतांना दिसते आहे. या महिन्यात तब्बल 18 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
देशातील प्रमुख पाच शहरातील दर
मुंबई – पेट्रोल 96.32 रुपये, डिझेल 87.32 रुपये
दिल्ली – पेट्रोल 89.88 रुपये, डिझेल 80.27 रुपये
चेन्नई – पेट्रोल 91.98 रुपये, डिझेल 85.31रुपये
कोलकाता – पेट्रोल 91.11 रुपये, डिझेल 83.86 रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल 63 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) मधील बेंचमार्क क्रूड ऑईल मंगळवारीच्या सत्रात 0.51 टक्क्यांनी वधारून 63.62 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं. न्यूयॉर्क मर्केंटाइल एक्सचेंजवर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या (डब्ल्यूटीआय) मार्च कॉन्ट्रॅक्टमध्ये सत्रातील 1.31 टक्क्यांनी वाढून 60.25 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर हे सकाळी 6 पासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड आयओसीएलच्या वेबसाईटरवर मिळेल.