‘सैराट’, फॅन्ड्री अशा दर्जेदार कलापृतींसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘नाळ’, ‘द सायलेन्स’, ‘हायवे’, ‘बाजी’ या चित्रपटांतून अभिनेता म्हणूनही स्वतःला सिद्ध केले आहे.
पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीची प्रस्तुती असलेल्या ‘तार’ या लघुपटात ते पोस्टमनची भूमिका साकारणार आहेत.
नुकतेच या लघुपटाचे पोस्टर रितेशने इन्स्टाग्रामवरून रितेशने शेयर केले आहे. यात नागराज सायकलवरून पत्र पोहोचवणा-या पोस्टमनच्या लूकमध्ये झळकत आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शकांनी बनवलेल्या मराठी लघुपटाची सिरिज मुंबई फिल्म कंपनी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे असे रितेशने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
पंकज सोनावणे दिग्दर्शित या लघुपटात नागराजसह पूजा डोळस-चौधरी, ज्योती जोशी, रामचंद्र धुमाळ आणि भूषण मंजुळे आदी कलाकार झळकणार आहेत.
आगामी काळात नागराज मंजुळे ‘झुंड’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाद्वारे ते बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून यात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.