जळगाव – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती/संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्टे आहेत.
योजनेसाठी वैयक्तिक मधपाळ हा साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य. वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ व्यक्ति किमान 10 वी पास असावी. वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तिच्या नांवे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेती, जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावीत.
आग्या मध संकलन, प्रशिक्षण व संच किट वाटप करीता पात्रता पारंपारिक कारागिर असून 5 व्यक्तीचा 1 समुह असावा. वय 18 वषोपेक्षा जास्त व लिहिता वाचता येणारा असावा. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र व इतर पुर्तता पुर्ण करुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी केंद्रचालक 20 दिवस निवास प्रशिक्षण महाबळेश्वर व मधपाळ निवासी प्रशिक्षण 10 दिवस जिल्हास्तरावर घेणे अनिवार्य राहील.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, व्दारा जिल्ह उद्योग केंद्र, आय.टी.आय, जळगाव, दुरध्वनी क्रमांक 0257 -2252971, संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा-412 806 दुरध्वनी-02168-260264 येथे संपर्क करावा. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.