मुंबई, वृत्तसंस्था – दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दररोज होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहनचालकांचे पुरते कंबरडे मोडले असून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची मालिका केव्हा थांबणार असा एकच प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. आजही राज्यासह अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. तर राजस्थानमध्ये पेट्रोलच्या किंमतीने अक्षरश: शंभरी ओलांडली आहे. देशातील सर्वात जास्त वॅट असलेल्या राजस्थानमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत असून आज श्रीगंगानगरमध्ये सामान्य पेट्रोल ९८.७० रुपये प्रति लिटर आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०२ रुपये प्रति लिटर आहे. तर जयपुरमध्ये पेट्रोल ९३.८६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८५.९४ रुपये प्रति लिटर झाले आहे. याचे कारण केवळ वॅट नसून लावण्यात आलेल्या रोड सेसमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. तर आज मुंबईमध्ये पेट्रोल ९५ रुपयांवर गेले. तर डिझेल ८६ रुपयांवर गेले आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रति लीटर ९५.७५ रुपये तर डिझेल ८६.७२ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत ८९.२९ रुपये लीटर आहे. तर डिझेलची किंमत ७९.७० रुपये प्रति लीटर आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर
नाशिक ९५.८५ रुपये प्रतिलिटर
पुणे ९५.६३ रुपये प्रतिलिटर
नागपूर ९५.५९ रुपये प्रतिलिटर
कोलकाता ९०.५४ रुपये प्रतिलिटर
प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर
नाशिक ८५.४९ रुपये प्रतिलिटर
पुणे ८५.३० रुपये प्रतिलिटर
नागपूर ८५.२७ रुपये प्रतिलिटर
कोलकाता ८३.२९ रुपये प्रतिलिटर
६ वाजल्यापासून लागू होतात नवे दर
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमतही दुप्पट होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.