मुंबई, वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ भोगत असलेल्या मुंबईकरांना आता सीएनजी आणि पीएनजीचीही दरवाढ भोगावी लागणार आहे. मुंबईमध्ये घरगुती वापरासाठीचा तसेच वाहनांसाठी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच CNG चे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ स्वरुपात करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे वाहनांसाठीचा सीएनजी किलोमागे दीड रुपयांनी महागला असून तो आता प्रतिकिलो 49.40 रुपयांना मिळणार आहे. सोमवारपर्यंत हा दर 47.90 रुपये इतका होता.
महानगर गॅसने घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरातही वाढ केली आहे. पाईपद्वारे गॅस पुरवठ्यासाठी म्हणजेच पीएनजीच्या प्रति युनिटमागे 0.95 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे स्लॅब 1 साठीचा प्रति युनिट दर 29.85 रुपये झाला आहे तर स्लॅब 2 साठीचा प्रति युनिट दर 35.45 रुपये इतका झाला आहे. महानगर गॅसने या दरवाढीची कारणे देताना म्हटले आहे की कोरोना काळात वाढलेला संचालनाचा खर्च, मनुष्यबळाची टंचाई यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.
महानगरने ही दरवाढ सोमवारी मध्यरात्रीपासूनच अंमलात आणण्याचे घोषित केले होते. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांच्या मते ही दरवाढ झाल्यानंतरही हे इंधन सर्वसामान्यांना परवडणारे आहे. सीएनजी हा पेट्रोलच्या तुलनेत 62 टक्के तर डिझेलच्या तुलनेत 41 टक्के स्वस्त असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पीएनजी हा सिलेंडरचा गॅस घेण्यापेक्षा बचतीचा आणि अत्यंत सुरक्षित व सोयीचं असल्याचं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांसाठी ही बातमी धक्कादायकच म्हणावी अशी आहे कारण मुंबई आणि उपनगरांत बहुतांश घरांमध्ये पाईप गॅस पोहोचलेला आहे. शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील टॅक्सी आणि रिक्षा या सीएनजीवर धावत असतात. यामुळे या सगळ्यांवर दरवाढीचा परिणाम जाणवणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 25 जुलैला सीएनजीचे दर 1 रुपयांनी वाढवण्यात आले होते. 6 ऑक्टोबरला सीएनजीचे दर 1.6 रुपयांनी वाढवण्यात आले. सोबतच पीएनजीचे दर 70 पैशांनी वाढवण्यात आले होते.