जालना, वृत्तसंस्था : जालन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पाहेगाव येथील शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश शेळके यांचा सेवली-नागापूर या आडमार्गी रस्त्याच्या दरीत मृतदेह आढळून आला आहे.
यातील गंभीर बाब म्हणजे शेळके यांचा खून करून कारमध्ये मृतदेह ठेवण्यात आला. त्यानंतर कार आणि मृतदेह जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारसह घटनास्थळी सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रावरून हा जळालेला मृतदेह रमेश शेळके यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सेवली-नागापूर या आडमार्गी रस्त्याच्या दरीत एक कार जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती सेवली पोलिसांनी सोमवारी सकाळी मिळाली. त्यानुसार सेवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता, कारमध्ये पुरुष जातीचा हाडांचा सांगळा दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहिणी केल्यानंतर एक पाकीट पोलिसांनी मिळून आले. पाकिटातील कागदपत्रावरून हा मृतदेह शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश शेळके यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
तसेच घटनास्थळी काही दगडांवर व रूमालावर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे रमेश शेळके यांची हत्या करून त्यांचा मृतदेह कारमध्ये ठेवून कारसह मृतदेह जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेटी दिली.
या घटनेची माहिती मिळताच परतूरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सेवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे, मंठा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन गुड्डेवार यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचारी, फिंगर प्रिंट पथक, डॉग स्कॉड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.