बिहार, वृत्तसंस्था – बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात ‘हाथरस’ सारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. याठिकाणी 12 वर्षांच्या नेपाळी मुलीवर कथित सामूहिक बलात्कार आणि नंतर हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्राथमिक चौकशी आणि व्हायरल व्हीडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण स्थानिक पोलीस स्टेशन प्रमुखाच्या मदतीने घडवून आणल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र झा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, “जो ऑडिओ व्हायरल झाला आहे त्यानुसार स्टेशन प्रमुख संजीव कुमार रंजन यांचा निष्काळजीपणा आणि त्यांनी कर्तव्य न बजावल्याचे स्पष्ट होते. त्यांना निलंबित केले आहे. चौकशीदरम्यान साक्षीदाराचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.”
काय आहे प्रकरण?
नेपाळच्या बारबर्दिया इथं राहणारे सुरेश (बदललेले नाव) गेल्या सात वर्षांपासून मोतिहारी येथील कुंडवा चैनपूर येथे मजुरी करतात. ही घटना 21 जानेवारी रोजी घडल्याचं सुरेश सांगतात. त्यांची पत्नी नेपाळमध्ये आपल्या गावी गेली होती. सुरेश मजुरीसाठी गेले होते आणि मुलगा बाजारात गेला होता.
पूर्वी चंपारण येथील सिकहना, विभागीय पदाधिकाऱ्यांना सुरेश यांनी दिलेल्या निवेदनानुसार, “संध्याकाळी चार वाजता माझा मुलगा बाजारातून घरी येत असताना घरमालकाने त्याला थांबवले. पण तरीही मुलगा घरी पोहचला. आपली बहीण जखमी अवस्थेत त्याला आढळली. मुलाने मला घरी बोलवले. मुलीच्या गळ्याला लाल डाग होते. तिला घेऊन मी स्थानिक डॉक्टरांकडे पोहचलो पण त्यांनी उपचार केले नाहीत.”
लोकांची गर्दी जमली आणि त्यांनी मृतदेह जाळण्याचा आग्रह केला. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, “देवेंद्र कुमार साह यांनी मृतदेह जाळला नाही तर तुझी आणि मुलाची हत्या करून नेपाळमध्ये फेकू अशी धमकी दिली. यानंतर एका कागदावर माझा अंगठा लावला आणि रात्री बारा वाजता बळजबरीने पोखर रोडवर मीठ आणि साखर टाकून मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला (सुरेश) नेपाळला पाठवले.”
घटनेच्या 12 दिवसांनी गुन्हा दाखल
21 जानेवारी रोजी झालेल्या घटनेची तक्रार 2 दोन फेब्रुवारीला नोंदवली. एकूण 11 आरोपींचा उल्लेख करण्यात आला. विनय साह, दीपक कुमार साह, रमेश साह, देवेन्द्र कुमार साह या चौघांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. इतर सात जणांमध्ये घलमालक सियाराम साह यांचा समावेश आहे. मृतदेह बळजबरीने जाळून साक्ष मिटवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर 5 फेब्रुवारीला एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. 21 जानेवारीला कुंडवा चैनपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख संजीव कुमार रंजन आणि आरोपी रमेश साह यांच्यातील संभाषण या क्लीपमध्ये आहे.
या संभाषणात संजीव कुमार रमेश साहला सांगत आहेत, “मुलीची व्यवस्था करा आणि मुलगी थंडीमुळे गेली हे लिहा.”
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र झा यांनी बीबीसीला सांगितले, “याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी विभागीय पोलीस पदाधिकारी सिकहरना यांच्या नेतृत्त्वात SIT स्थापन केली आहे.”
‘भारतात सर्व पुरुष असेच आहेत का?’
याप्रकरणी पीडिताच्या कुटुंबाशी बीबीसीचे बोलणे होऊ शकले नाही. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा किशोर यांच्याशी पीडित कुटुंबाने व्हीडिओ कॉलवर संपर्क साधला. या व्हीडिओ कॉलमध्ये पीडिताचे कुटुंबीय विचारत आहेत, “भारतात सर्व पुरुष असेच आहेत का? पोलीसही असेच आहेत का? आम्हाला न्याय हवा आहे. त्यांनी मृतदेह पुरू न देता जाळण्यासाठी बळजबरी केली.”
या प्रकरणात पीडित मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाले नाही. त्यामुळे महत्त्वाचे पुरावे मृतदेह जाळल्याने नष्ट झाले.
सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा किशोर यांनी बीबीसीला सांगितले, “मुलीची आई 31 जानेवारीला मोतिहारी येथील माझ्या घरी आली होती. खूप रडत होती आणि न्याय मिळावा अशी मागणी करत होती.”
वर्ष 2005 पासून नितीश कुमार यांचे सरकार चौथ्यांदा सत्तेत आले. यावेळी राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री रेणू देवी मिळाल्या. पण यामुळे महिलांवरील अत्याचार कमी करण्यास मदत होतेय असे चित्र सध्यातरी दिसत नाही.
गेल्या चार महिन्यातच बिहारमध्ये महिलांविरोधात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात वैशाली येथील 20 वर्षांच्या तरुणीने छेडछाडीला विरोध केल्याने तिला जीवंत जाळले आणि तिचा मृत्यू झाला.
मधुबनी येथे एका मूकबधिर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे दोन्ही डोळे फोडण्यात आले. मुजफ्फरपूर येथे 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिला जाळण्यात आले.