जळगाव – ‘वीर जवान राहूल पाटील अमर रहे’ ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात वीरजवान राहूल पाटील यांच्या पार्थिवावर आज सकाळी एरंडोल, जिल्हा जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जवान राहूल पाटील हे सीमा सुरक्षा दलात पंजाब येथे कार्यरत होते. शुक्रवार, 5 फेब्रुवारी, 2021 रोजी पंजाब-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पार्थिवावर आज एरंडोल येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरुवातीस वीरजवान राहूल पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. खासदार उन्मेष पाटील, माजीमंत्री तथा आमदार गिरीष महाजन, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, एरंडोलचे नगराध्यक्ष रमेश परदेशी, उप विभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
या वीर जवानावर शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयामागील भवानी माता मंदिरासमोरील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘राहुल पाटील अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता. यावेळी पोलिस व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. वीरजवान राहुल यांची मुलगी आणि पुतण्या यांनी अग्निडाग दिला. यावेळी राहुलची आई, भाऊ, बहीण, दोन मुली, पत्नी यांच्यासह उपस्थितांना शोक अनावर झाला होता.
तत्पूर्वी सकाळी वीरजवान राहूल यांचे पार्थिव धरणगाव चौफुली येथे पोहोचले. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवर राहुलचे पार्थिव ठेवण्यात आले होते. एरंडोलच्या गांधीपुरा भागातील शंकर नगर मधील त्याच्या राहत्या घरापासून अंतिमयात्रा काढण्यात आली. यावेळी कुटुंबासह नातेवाईक, नागरीक यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी नपाचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, तुषार देवरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शोक संदेश वाचून दाखविला. कवी वा. ना. आंधळे यांनी राहुलची व कुटूंबियांच्या पार्श्वभूमीची माहिती दिली.
पालकमंत्र्यांकडून राहूल पाटील यांच्या कुटूंबियांचे सांत्वन
वीरजवान राहूल पाटील यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले. तसेच कुटूंबियांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे यावेळी सांगितले.