मुंबई | रेणू शर्मानंतर आता करुणा शर्माने नवे आरोप केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसत होत्या, मात्र त्यातच त्यांच्या मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाल्याचं मानलं जातंय.
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. आपल्याला आपल्या मुलांना भेटू दिलं जात नाही, मुलांना डांबून ठेवण्यात आलं आहे, तसेच कौंटुंबिंक हिंसाचाराचे आरोप त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत.
दुसरीकडे या आरोपानंतर धनंजय आणि करुणा यांच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तीनं स्वतःच्या यूट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये ती आपल्या मैत्रिणीसोबत आनंदात असल्याचं दिसत आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप करुणा यांनी केला असला तरी या व्हिडीओत मुलगी आनंदात असल्याचं दिसत आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु असल्याचं करुणा यांनी म्हटलं असलं तरी मुलीचा हा व्हिडीओ आठवडाभरापूर्वीचा असल्याचं दिसतंय. त्यामुळे करुणांच्या आरोपात किती तथ्य आहे यावर शंका उपस्थित केली जातेय.