जळगाव, प्रतिनिधी । अनुकंपा यादीत नाव असून देखील मनपा प्रशासनाचा चालढकल कारभारामुळे वय निघून जात असल्याने त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत असल्याने शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी रोष व्यक्त केला. अनुकंपाधारकांच्या प्रश्नावरून शिवसेना तसेच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.
अनुकंपाधारकांच्या प्रश्नांवर महापालिका प्रशासन योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. यातच शासनाची आकृतिबंधाला मान्यता मिळावी यासाठी योग्य पाठपुरावा केला जात नसल्याने महापालिका प्रशासनाचा विरोधी पक्ष शिवसेनेचे नितीन लढ्ढा, प्रशांत नाईक व सत्ताधारी भाजपचे नवनाथ दारकुंडे यांनी निषेध व्यक्त करून सभात्याग केला.
मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मंगळवारी सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे, शाम गोसावी, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, नगरसचिव सुनिल गोराणे आदी उपस्थित होते.
भाजपच्या सदस्यांनी शहरतील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली. नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी स्वातंत्र्य चौक ते महाबळ रस्त्याची त्वरीत डागडुजी करण्याची मागणी केली. नगरसेविका सरिता नेरकर यांनी देखील रस्त्यावरील चाऱ्या बुजविण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार केली. तसेच नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी वॉटरग्रेसकडून शहरात साफसफाई होत नाही, कचऱ्याच्या वाहनांमध्ये मुरुम माती भरुन वजन वाढविण्याचे प्रकार घडतात, मक्तेदाराकडून अटी शर्तीच्या भंग होत आहे तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
त्याच प्रमाणे जर मक्तेदाराकडून योग्यपध्दतीने साफसफाई होत नसेल तर, ठेका रद्द का करण्यात येत नाही, असा जाबही नगरसेवक पाटील यांनी विचारला. तर, नगरसेवकांनी मनपाचे आरोग्य कर्मचारी व इंजिनिअर हे मुजोर झाले असून नगरसेवकांच्या सुचनांना फाटा देत असल्याची खंत व्यक्त केली. सभापती घुगे- पाटलांनी देखील मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात यावी, असे सांगितले.