पिंपरी, वृत्तसंस्था – डेटिंग ऍपद्वारे तरुणांना बोलवून लुबाडणारी तरुणी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. तिने आत्तापर्यंत 16 जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाइल फोन असा 15 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली. सायली देवेंद्र काळे (27, रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने बंबल ऍपवर मैत्री करून रावेत येथील तरुणाला 10 डिसेंबर 2020 रोजी भेटण्यास बोलावले. भेटी दरम्यान तरुणीने त्याला गुंगीचे औषध देऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख 85 हजारांचा ऐवज काढून घेतला. तसेच, 17 जानेवारी रोजी चेन्नई येथून वाकड येथे आलेल्या एका युवकाकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख 50 हजारांचा ऐवज अशाच पद्धतीने काढून घेतला.
अशी करायची फसवणूक
आरोपी डेटिंग ऍपवरून श्रीमंत तरुणांना हेरायची व तरुणाच्या घरी किंवा लॉजवर भेटायला जात असे. त्यानंतर शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकून तरुणाच्या अंगावरील दागिने आणि रोख रक्कम काढून घेत असे. दरम्यान तरुणाचा मोबाइल घेऊन चॅट डिलिट करून डेटिंग ऍपवरील खाते डिऍक्टीव्ह करायची व मोबाइल फोडून कचऱ्यात टाकून द्यायची. त्यामुळे पोलीस तिच्यापर्यंत पोहचत नव्हते.
लॉकडाऊनमुळे बेरोजगार
तरुणीच्या वडिलांचे निधन तर आईला दुर्धर आजाराने ग्रासले आहे. तरुणी उच्चशिक्षित असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये तिची नोकरी गेली. त्यानंतर हे प्रकार सुरु केले. आईसाठी घेतलेल्या झोपेच्या गोळ्याचा वापर तिने तरुणांवर केल्याचे उघड झाले आहे.
तक्रार होत नसल्याने फावले
फसवणूक झाल्यानंतर बदनामी होईल या भीतीने तरुण तक्रार करीत नव्हते. आतापर्यंत तरुणीने 16 जणांना फसवल्याची कबुली दिली आहे. यातील चौघांनी तक्रार दिली आहे. इतरांनी देखील तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
असा रचला सापळा
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ऍपवर स्वत:चे खोटे प्रोफाइल तयार करून तरुणीचे प्रोफाइल शोधून काढले. तिला काही फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या. त्यातील एक फ्रेंड रिक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. त्यानंतर चॅटिंग करून भेटीची वेळ ठरविण्यात आली. भूमकर चौक येथे 26 जानेवारी रोजी भेटायला आल्यानंतर तरुणीला ताब्यात घेण्यात आले.
आयुक्तांनी केले कौतुक
गुन्हे शाखा युनिट चारने केलेल्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केले. या कामगिरीसाठी पथकाला बक्षीस देखील जाहीर केले. यावेळी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, स्वाती रुपनवर, वैशाली चांदगुडे, सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक संजय तुंगार, तसेच राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे आदी उपस्थित होते.