कोल्हापूर: भारतीय रिजर्व बँकेने खातेदारांचे हित लक्षात घेत त्यांचे नुकसान टाळण्यासाठी बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि अनियमित कामकाज प्रकरणी राज्यातील आणखी एका खाजगी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मधील शिवम सहकारी बँकेवर आरबीआय अर्थात रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कारवाई करण्यात आली आहे. या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली. अवसायानात प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवीनुसार ५ लाखापर्यंतची रक्कम डीआयजीसीकडून मिळणार आहे. तर बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डिआयसीजीसीकडून ठेवींवर विमा संरक्षण आहे. त्यामुळे आरबीआयच्या या कारवाईमुळं राज्यातील आणखी एका सहकारी बँकेला टाळे लागले आहे.
या प्रकरणात तब्बल 24 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक घोटाळा झाल्याची बाब उघड होत असून बँकेतील 37 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापुढं बँकेला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. मात्र बँकेतील खातेदारांना मात्र काहीसा दिलासा आरबीआयकडून देण्यात आला आहे. तर महाराष्ट्र रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटीव्हनं बँक बंद करण्याचे आदेश द्यावेत असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.