पुणे – तब्बल दहा महिन्यांनंतर शहरातील महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. शासन निर्देशानुसार शहरातील शाळांनाची स्वछता करून शाळा सुरु करण्यात आल्या. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून धानोरी भैरवनगर येथील गोकुलम शाळेतील ५ वी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. विद्यार्थ्यांचे तपासणी करून तसेच त्यांचे औक्षण करून त्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आले.
शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वीच राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू झाले. शाळांमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
दरम्यान, सर्व शाळांना तयारीसाठी वेळ मिळावा, तसेच शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन व्हावे, यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर एका बाकावर एक विद्यार्थी, शारीरिक अंतर ठेवत बैठक व्यवस्थाही शाळांना करावी लागणार आहे.
प्राथमिकच्या शाळा पहिल्या टप्प्यात जवळपास तीन तासांपर्यंत भरविल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आई-वडील दोघेही नोकरीवर असणाऱ्यांना वाहतुकीचा प्रश्न भेडसावणार आहे. तसेच, समंतीपत्र देणे म्हणजेच काय, याविषयी पालकांना काहीच माहिती नाही. त्याचे उत्तरही शाळांकडे नाही. तसेच, पालकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारीसाठी संवाद सभा शाळांनी घ्यावी. म्हणजेच पालकांना मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रम दूर होईल.