मुंबई – अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा असल्याची ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हंटले आहे. खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते.
एकनाथराव खडसे म्हणाले, “अनेकांना भाजपा सोडण्याची इच्छा आहे. परंतु, त्यांना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगून थांबविण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकार पडणार नाही”, असेही त्यांनी सांगितले.
तसेच , “माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकशा लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले तर ईडी-बिडी लावतील, तर मी बोललो मी सीडी लावीन”, अशी फटकेबाजी करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील वरीष्ठांनीच राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला, असेही खडसेंनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल एकनाथराव खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.