नवी दिल्ली: भारत आणि इस्रायल यांच्या परराष्ट्र संबंधांना २९ जानेवारी रोजी २९ वर्षे झाली. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व ओळखून मुद्दाम शुक्रवारी २९ जानेवारी रोजी दिल्लीत इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुदैवाने या स्फोटात तीन-चार गाड्यांच्या काचा फुटण्यापलिकडे कोणतीही हानी झालेली नाही. बॉम्बस्फोटात कोणीही जखमी झालेले नाही. जीवितहानी झाली नसली तरी दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाल्यामुळे तातडीने तपास सुरू झाला आहे. तपासातून आतापर्यंत मर्यादीत महत्त्वाची माहिती हाती आली आहे.
इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट ज्या वेळी झाला त्याचवेळी दिल्लीत (संध्याकाळी) बीटिंग रिट्रीट (वाजतगाजत राजपथावरील संचलनाची सांगता) सुरू होती. बीटिंग रिट्रीट बघण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्हीआयपी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याआधी प्रजासत्ताक दिनी राजपथावर सुरू असलेले संचलन संपण्याच्या सुमारास दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसा झाली. ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली दिल्लीत घुसलेल्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणे, पोलिसांवर तलवार उगारणे, जोरदार दगडफेक करणे या पद्धतीने हिंसक धुडगूस घातला होता. यात प्रामुख्याने पंजाब, हरयाणातून आलेला जमाव होता. शेतकरी म्हणून सहानुभूती मिळवू पाहणाऱ्या या जमावाने लाल किल्ल्यावर प्रचंड नासधूस केली आणि संघटनेचा तसेच धार्मिक अशा स्वरुपाचे झेंड फडकावले होते. या घटनेनंतर २९ जानेवारी रोजी इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला. यामुळे संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट देण्यात आला. भारताने इस्रायलशी संबंधित देशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या संरक्षणात वाढ केली आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेक रस्त्यांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरू झाली. आवश्यकतेनुसार वाहनातून प्रवास करणाऱ्यांचीही चौकशी आणि तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.
इस्रायलच्या दूतावासाबाहेर एपीजे अब्दुल कलाम मार्ग आणि जिंदल हाऊस यांच्या जवळ कमी क्षमतेच्या आईडीचा स्फोट झाला. जिथे स्फोट झाला त्याच ठिकाणावरुन एक पाकीट (लिफाफा) तपास पथकाने जप्त केले. या पाकिटावर इस्रायलच्या दूतावासाचा पत्ता होता. स्फोटाच्या ठिकाणावरुन बॉल बेअरिंग जप्त करण्यात आले. या बॉल बेअरिंगचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता. दहशत माजवणे या एकाच उद्देशाने बॉम्बस्फोट करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एपीजे अब्दुल कलाम मार्ग येथील एका कुंडीतील मातीत आयईडी लपवला होता, असे काही जणांनी सांगितले तर कलाम मार्गावर रस्त्याच्या कडेला लाकडांखाली आयईडी लपवला होता, असे काहींनी सांगितले. या प्रकरणी तपास सुरू आहे. मात्र कलाम मार्गावरच स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.
बॉम्बस्फोटाच्या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग परिसरातील तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी व्यवस्थित केले आहे. फुटलेल्या बॉम्बमधील स्फोटकांची गुणवत्ता उत्तम होती पण बॉम्ब ठेवण्याच्या जागेमुळेच स्फोटाची तीव्रता मर्यादीत राहिली, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तपास पथकाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजमध्ये महत्त्वाचा दुवा सापडला आहे. तपास सुरू असल्यामुळे या संदर्भातली सविस्तर माहिती जाहीर करण्य़ात आलेली नाही.
स्पेशल सेलने बॉम्बस्फोट प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. घटनास्थळावरुन जप्त केलेल्या पाकिस्टावर इस्रायल राजदूत असे नमूद केले आहे. याच पाकिटावर पुढे इस्रायलच्या दूतावासाचा पत्ता नमूद केला आहे. संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. यात इतर कुठेही बॉम्ब सापडलेला नाही.
दिल्लीत कार्यरत सुरक्षा यंत्रणेच्या कामाचा ताण वाढवणे, त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधून मोठा घातपात करणे, कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणे, दहशत माजवणे या प्रमुख हेतूंना साध्य करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. बॉम्बस्फोट करण्यामागे नेमक्या कोणत्या व्यक्तीचा अथवा संघटनेचा हात आहे याचा शोध सुरू आहे. खलिस्तानवाद्यांचा या बॉम्बस्फोटाशी काही संबंध आहे का, चीन अथवा पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या कोणी स्वतःची ओळख लपवून हा बॉम्बस्फोट केला आहे का, याचाही तपास सुरू आहे. सर्व संभाव्य शक्यतांची पडताळणी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने देशविरोधी विचार पसरवून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो सोशल मीडिया अकाउंटना ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सायबर सेलचे अधिकारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात आहेत. सायबर सेलने देशविरोधी विचार पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून निवडक वेबपेज तसेच वेबसाइट ब्लॉक करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला. याआधी मनमोहन सिंह यांचे सरकार सत्तेत असताना फेब्रुवारी २०१२ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन वेगाने आलेल्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या अधिकृत घराजवळच्या सिग्लनवर थांबलेल्या इस्रायलच्या दूतावासाशी संबंधित कारवर स्टिकरच्या मदतीने स्फोटके चिटवून बॉम्बस्फोट केला होता. या स्फोटात इस्रायलच्या दूतावासातील एका अधिकाऱ्याची पत्नी गंभीर जखमी झाली आणि कारचे अतोनात नुकसान झाले होते.
स्टिकर बॉम्बस्फोट प्रकरणी इस्रायलने इराणवर संशय व्यक्त केला होता. मात्र इराणने इस्रायलचे आरोप फेटाळले होते. या घटनेनंतर एकदम २९ जानेवारी २०२१ रोजी इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला. सुदैवाने स्टिकर बॉम्बस्फोट या प्रकाराची भारतात अद्याप पुनरावृत्ती झालेली नाही.