जळगाव, – जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिलेत.
येथील जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदि उपस्थित होते.
खासदार श्रीमती खडसे पुढे म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सुचनाफलक ठिकठिकाणी लावावे. ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलीत करुन तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. घोडसगाव येथे सर्व्हिसरोड तयार करण्याच्या सुचना देऊन महामार्गाच्या कामांची गती वाढविण्याचेही निर्देश दिलेत. बहुतांश अपघात हे वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचे गांर्भीर्य लक्षात न घेतल्याने होत असतात. यात दुचाकी धारकांची संख्या जास्त असल्याने दुचाकीला साईड मिरर आवश्यक करावा, यंत्रणांनी वाहतुक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यावेळी श्रीमती खडसे यांनी जळगाव-चिखली, जळगाव-धुळे, जळगाव-औरंगाबाद, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सद्यस्थितीचा माहिती सर्व संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली.
चाळीसगाव येथे परिवहन विभागाच्या उप कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने सादर करा- पालकमंत्री
नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उप कार्यालय सुरु करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा. अशा सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्यात. रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण होणे आवश्यक असून कामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता विभागाने घ्यावी. तसेच जे कंत्राटदार विहित कालावधीत कामे पूर्ण करणार नाही. त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच जिल्ह्यातील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या प्रस्तावांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. महामार्गावर प्रमुख गावांजवळ बसथांबा असावा, भविष्यातील अडचणी लक्षात घेता गिरणा नदीवरील बांभोरी पुलाला पर्यायी पुल उभारावा. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ ॲम्बुलन्स पोहोचेल याचीही काळजी घ्यावी.
वाहनांची नोंदणी करतांना कोणी बोगस कागदपत्रे तर सादर करीत नाही ना, याची खात्री विभागाने करावी. रिक्षांमध्ये वाढीव प्रवाश्यांची होणारी वाहतुक अपघाताला निमंत्रण देत असल्याने त्याचीही तपासणी व्हावी. रसत्यांवर वाहनाच्या गतीबाबतचे फलक लावावे, भुसावाळ येथील रुग्णालयात ऑक्सिजन टँक, पोस्टमार्टम रुम उभारावी, रुग्णालयाला वॉलकम्पाऊंड करण्याची मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली तसेच आमदार निधीतून एक ॲम्बुलन्सही देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली.
समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहतूक नियमांचे महत्व संबंधित यंत्रणांनी सर्व नागरिकांना समजविताना नियमांचे पालन केल्याने जिवीत तसेच वित्तीय हानी टाळता येवू शकते याचे समाज प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. वाहन चालवितांना हेल्मेट, सिटबेल्टाचा वापर करण्याच्या सुचना देतांनाच महामार्गावर माहिती फलक तातडीने लावण्याच्या सुचना दिल्यात. त्याचबरोबर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कठोर कारवाईची मोहिम राबविण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी सांगितले.
समिती सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात तरसोद फाटा टीव्ही टॉवर, शिव कॉलनी थांबा, चिंचखेड फाटा, धुळे चाळीसगाव रस्ता या तीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले आहे. मागीलवर्षी 2019 मध्ये जिल्ह्यात 835 अपघातात 454 मृत्यु झाले तर 770 व्यक्ती जखमी झाल्या असून 2020 मध्ये 752 अपघातात 471 मुत्यु झाले असून 514 व्यक्ती जखमी झाल्या असून मागीलवर्षीपेक्षा अपघातांची संख्या 10 टक्क्यांनी कमी झाले असून मृत्युंची संख्या 3.5 टक्के वाढली आहे तर जखमींची संख्या 33 टक्क्यांनी घटल्याचे सांगितले. तर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलीस विभागाने 2020 मध्ये 89 वाहने निलंबित केली असून 5 वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करुन प्रस्ताव परिवहन विभागास पाठविल्याची माहिती शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात पारोळा, मुक्ताईनगर, पाचोरा, अंमळनेर, रावेर आदि ठिकाणी ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या रस्त्यांबाबतची माहिती अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा आणि धुळेचे अरविंद काळे यांनी दिली. बैठकीस परिवहन, एस.टी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे जीवनदूत पुरस्काराच्या मानकरी
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी अनेक वेळा नागरीक बघ्याची भूमिका घेतात. त्यात अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. अशा व्यक्तींना तातडीने दवाखान्यात दाखल करुन त्यांना उपचार मिळावे, जेणेकरुन त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल. यासाठी शासनाने जीवनदूत पुरस्कार देण्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यानुसार वर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्रीमती तृप्ती धोडमिसे या भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून मागील महिन्यात रुजू होण्यासाठी जात असताना भडगाव येथे एक आजीचा अपघात झाला होता. श्रीमती धोडमिसे यांनी तातडीने त्यांना आपल्या वाहनात बसवून दवाखान्यात दाखल केले होते. शिवाय दवाखान्यात त्यांचेवर योग्य ते उपचार तातडीने मिळावेत यासाठी डॉक्टरांकडे पाठपुरावा केला होता. श्रीमती धोडमिसे यांनी आजींना तातडीने उपाचारासाठी दाखल करुन त्यांचा जीव वाचविल्याने त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार घोषित करण्यात आला. आज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत असल्याने श्रीमती धोडमिसे या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नाही. नंतर त्यांना हा पुरस्कार यथोचित प्रदान करण्यात येणारअसल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.