मुंबई : जेवणानंतर शतपावली करत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ५३ वर्षीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याला एकटे पाहून पाठिमागून आलेल्या लुटारुने त्यांचा गळा दाबला. यात, ते बेशुद्ध होत खाली कोसळताच त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून आरोपीने पळ काढल्याची धक्कादायक घटना बीकेसीत घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बीकेसी येथील आरबीआयच्या ऑफिसर्स क्वाँँटर्समध्ये तक्रारदार राहण्यास आहेत. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शतपावली करत असताना, अचानक पाठिमागून आलेल्या लुटारुने त्यांच्या गळ्याला दाबले. यात ते बेशुद्ध होवून खाली कोसळताच त्यांच्याकडील २२ हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून त्याने पळ काढला. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी घर गाठले. घड़लेला प्रकार कुटुंबियांना सांगताच त्यांनाही धक्का बसला.
अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास बीकेसी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांकड़े विचारणा केली असता त्यांच्याकड़ून माहिती देण्यात आली नाही. परिसरातील सीसीटिव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. काही संशयितांकड़े चौकशीही सुरु करण्यात येत आहे. तसेच मोबाईल लोकेशन नुसार पोलीस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.